उस्मानाबाद / प्रतिनिधी
कोरोना संकटामुळे शेतकरी उध्वस्त झाला असून आता खरीप पेरणीसाठी बी बियाणे व खते घेण्याची त्याच्याकडे कसली ऐपत राहिली नाही. त्यातच बँकाही पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेऊन बी बियाणे व खते खरेदी केले. त्यातच पेरलेलं सोयाबीन बोगस निघाल्यामुळे ते उगवलेच नाही .त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले. एकीकडे सरकारनं शेतकऱ्यांना  बियाणे व खते मागूनही मोफत दिले नाहीत .राज्याचे कृषिमंत्री मात्र बी बियाणे व खत मागण्यासाठी  वेषांतर करून एखाद्या खताच्या दुकानावर जाऊन शेतकऱ्याप्रति आस्था असल्याचे केविलवाणा प्रयत्न करत आहेत .शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते न देणाऱ्या कृषी मंत्री दादा भुसे यांनी नौटंकी बंद करण्याचे आवाहन जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केले आहे.
 सोयाबीनचे बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने तात्काळ योजना आखली पाहिजे. यापूर्वीही बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्या वर कारवाई तर झाली नाहीच परंतु शेतकऱ्याकडून कागदपत्र घेऊन तसेच पंचनामे होऊनही नुकसान भरपाई दिली नाही .त्यामुळे आता प्रशासकीय बैठका घेऊन बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यावर कारवाईचा फार्स तसेच पेरलेलं सोयाबीनची नुकसान भरपाई देण्याचे फक्त आश्वासन देऊ नये. बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. महाराष्ट्र सरकारने बँकांना दिलेले आदेश बँका केराच्या टोपलीत टाकत आहेत. महाराष्ट्र सरकार हेच शेतकरीविरोधी धोरण आखत असल्यामुळे शेतकऱ्यावर वारंवार संकटे येत आहेत. बी बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्या व सरकारचे साटेलोटे असल्यामुळेच सरकार कंपन्या विरुद्ध कारवाई करत नाही .त्यामुळे कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बोगस व निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यावर तात्काळ कारवाई करावी तसेच कोरोना संकटामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला मोफत बी-बियाणे व खतांचा तात्काळ पुरवठा करण्याची मागणी ॲड भोसले यांनी केली आहे.
 
Top