उस्मानाबाद / प्रतिनिधी-
बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण व उत्पादनात वाढ करण्यासाठी बीज प्रक्रिया करून रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी असे आवाहन लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी शेतीशाळा प्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.
लोहारा तालुक्यातील लोहारा येथे दिनांक 12 जून रोजी शेतकऱ्यांसाठी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी सहाय्यक नागेश जट्टे, शेखर पाटील,पोखरा योजनेचे रमण आगळे, सचिन रसाळ, पोलिस पाटील व बिरुदेव सुर्यवंशी आदी उपस्थित होते.    पुढे बोलताना बिडबाग म्हणाले की, घरगुती पावसात न भिजलेले सोयाबीनचे बियाणे उगवनशक्ती तपासून व बीज प्रक्रिया करून पेरणीसाठी वापरावे. तसेच बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी ५० ग्राम ट्रायकोडर्मा किंवा कार्बोक्सिन व‌ थायरम ३० ग्राम आणि त्यानंतर नत्र स्थिरीकरणासाठी रायझोबियम  २५० ग्राम व पीएसबी २५० ग्राम  प्रति १० किलो बियाणांस हळुवारपणे व अत्यंत काळजीपूर्वक चोळायला पाहिजे. तर रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी केल्यास पेरणीसाठी २० टक्के बियाणे कमी लागते त्यामुळे बियाणांबरोबरच खतांची देखील बचत होते. त्यासाठी ४ सोयाबीनच्या ओळीनंतर एक सरी सोडल्यास पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाऊस कमी झाल्यास सरीमध्ये पाणी बराच काळ साठुन राहते आणि जरी पाऊस जास्त पडला तरी अतिरीक्त पाणी हे सरीद्वारे बाहेर काढता तर येतेच.तर आंतर मशागत व फवारणी चांगल्या प्रकारे करता येऊन हवा खेळती राहील्याने पिकाची वाढ देखील चांगली होते व उत्पादनात २० टक्क्यापर्यंत वाढ होते असे सांगून ते पुढे म्हणाले की,
सध्या सर्वच शेतकऱ्यांच्या शेतावर निंबोळ्या या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत त्या गोळा करून ठेवाव्यात व भविष्यात फवारणीसाठी निंबोळी अर्काचा वापर केल्यास फवारणीचा खर्चही कमी होऊन रस शोषक किडी व अळ्यांचे नियंत्रण करता येते. यासाठी ५किलो निंबोळी  बारीक कुटून घ्यावी व ९ लिटर पाण्यात या निंबोळीची बुकटी रात्रभर भिजवून  दुसऱ्या दिवशी हे द्रावण गाळून घ्यावे व १ लिटर पाण्यात साबणाचा चुरा मिसळून हे दोन्ही द्रावण एकत्र मिसळून घ्यावे. हे दोन्ही
  १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास सर्वच पिकावरील रस‌ शोषक अळ्या व किडींवर नियंत्रण मिळविता येते असे त्यांनी सांगितले. यावेळी बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. या कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top