उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कोरोनाच्या पार्श्वभ्ूमीवर शासन,प्रशासन, पोलिस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा आदी सर्वच पातळ्यांवर मोठा संघर्ष सुरू आहे. या लढाईत जनजागृती, कोरोनाशी लढा, सकारात्मक घटना, नागरिकांना मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना प्रसिध्दी अनेक सकारात्मक बातम्यांवर आधारित प्रसारमाध्यमे आपली भूमिका अत्यंत चोखपणे बजावत आहेत. बेजबाबदारपणा, हेकेखोर धोरण, विसंगती, अधिकाऱ्यंातील विसंवाद, धोरण, अंमलबजावणीतील ढिसाळपणा आदी सारेकाही नागरिकांसह सर्वांसमोर मांडण्याची, अारसा दाखविण्याची भूमिका प्रसार माध्यमे अत्यंत प्रभावीपणे पार पाडत आहेत. असे असताना औरंगाबाद प्रशासनाने भास्कर ग्रुपच्या दिव्य मराठीवर दाखल केलेला खटला मागे घ्यावा अशी मागणी उस्मानाबाद जिला पत्रकार संघाने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
आपले कर्तव्य पार पाडण्याचे काम वृत्तपत्रे करीत आहेत. या पार्श्वभूमीवर दैनिक दिव्य मराठीच्या औरंगाबाद शहरातील अशाच वार्तांकनावर आक्षेप घेत या दैनिकाचे प्रकाशक, संपादक आणि पत्रकार यांच्याविरोधात पोलिस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. सत्य जगासमोर मांडण्याचा प्रसारमाध्यमांचा हक्क हिरावण्याचा हा अत्यंत बेजबाबदार प्रयत्न आहे. उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ या प्रकाराचा निषेध करत आहे.  कोरेानाशी झुंज देताना आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे बजावणाऱ्या पत्रकारांची अशाप्रकारे छळवणूक होणार नाही, याकडे आपण लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.  दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा,संबंधितांना असे कृत्य पुन्हा होणार नाही, यासाठी लेखी समज देण्यात यावी आणि पत्रकारांना आपले कर्तव्य बजावण्यात कोणताही अडथळा येणार नाही, त्यांना संरक्षण मिळावे, अशी मागणी  केली आहे. तसेच  केंद्र सरकारकडून पीटीआयची गळचेपी केली जात अाहे, त्याचाही पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.
  यावेळी उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, सरचिटणीस भीमाशंकर वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, कमलाकर कुलकर्णी, पत्रकार राहुल कुलकर्णी, महेश पोतदार, देविदास पाठक, सयाजी शेळके, प्रवीण पवार, हुंकार बनसोडे, श्रीराम क्षीरसागर, जी.बी.राजपूत, मल्लीकार्जून सोनवणे, मच्छिंद्र कदम, सुधीर पवार, अझर शेख, काकासाहेब कांबळे, आरिफ शेख यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
 
Top