तुळजापूर /प्रतिनीधी
सव्वा महिन्यानंतर तुळजापुरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील आर्य चौक व लोहिया परिसरात प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाच्या वतीने तातडीने परिसर सील करत रुग्णाच्या कुटुंबातील ८ व इतर ८ असे तब्बल १६ लोकांना क्वाॅरंटाइन करण्यात आले आहे.
दरम्यान शहराच्या मध्यवर्ती आर्य चौक भागात कोरोना रुग्ण सापडल्याने नगरपालिका प्रशासनाच्या वतीने तातडीने शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
शहरातील आर्य चौक परिसरात विहीरी नजीक ७० वर्षीय वृद्धाचा कोरोना अहवाल शनिवारी (दि.२७) रात्री उशिरा पाॅझिटिव्ह आला, त्यानंतर तातडीने हालचाल करत पालिका प्रशासनाने परिसर सील करत रुग्णाच्या संपर्कातील १६ लोकांना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय रविवारी सकाळी परिसरात फवारणी करण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसीलदार सौदागर तांदळे, मुख्याधिकारी आशिष लोकरे, नगरसेवक सुनील रोचकरी, अभिजित कदम आदींनी कंटेनमेंट झोनला भेट देऊन पाहणी केली.
  दारू दुकाने सुरू
शहरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने रविवारपासून तीन दिवस शहर बंदची घोषणा केली. या वेळी भाजी, किराणा दुकाने सक्तीने बंद ठेवण्यात आली. मात्र यावेळी शहरातील दारू दुकाने खुली होती. दोन वाईन शाॅपसह अनेक देशी दारू व बियर शाॅपी तसेच वासुदेव गल्ली व घाटशिळ रोडलगतची अवैध दारू विक्रीच्या दुकानातून राजरोसपणे दारू विक्री सुरू होती. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 
 
Top