उस्मानाबाद /प्रतिनिधी - 
गेल्या सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने काय केले अशी सतत टिका करुन मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून म्हणजेच गेल्या सहा वर्षापासून विरोधकावर टीका करण्यापलीकडे दुसरे काय काम केले ? हे जनतेला सांगावे असा सनसनाटी , टोला  काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मधुकरराव चव्हाण, माजी अध्यक्ष विश्वास शिंदे, जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, जि प सदस्य प्रकाश आष्टे, माजी जि प सदस्य दिलीप भालेराव, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शेरखाने आदी उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले की भाजपची मंडळी  सतत काँग्रेस पक्षाने गेल्या सत्तर वर्षात काय केले असे दिशाहीन वक्तव्य करून ते जनतेची दिशाभूल करत आहेत काँग्रेसने आजपर्यंत जे विकासात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली त्यामुळेच आज देशाची प्रगती झाली आहे. काँग्रेसमुळेच सर्व सोयीसुविधा व विकासाचा पाया मजबूत करण्याचे काम सर्व क्षेत्रात केले आहे. मात्र भाजपकडे कुठलेही विकासाची दृष्टी नसून केवळ कॉंग्रेसने काय केले ? असे वक्तव्य करुन जनतेला दिशाहीन करण्याचे काम नियोजनबध्द सुरू असल्याचा टोला लगाऊन ते म्हणाले की,  देशाच्या सीमेवर भयानक घडामोडी घडत आहेत.  एकीकडे चीन आक्रमण करून हल्ला करीत आहे तर दुसरीकडे पाकिस्तान व आता नेपाळ देखील आपल्या भूभागावर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याबाबत विरोधकांना व जनतेला सत्य माहिती न सांगता ती दडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.  केंद्र सरकार व्यवस्थितरित्या आपली जबाबदारी पार पाडीत नाही.  देशाचे परराष्ट्र संबंध व त्याविषयी घ्यावयाची दक्षता व सावधगिरी न बाळगल्यामुळे आज शेजारील राष्ट्र घुसखोरी करत आहेत असा आरोप करून ते म्हणाले की, कोरोनामुळे जो लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारशी कुठल्याही प्रकारचा समन्वय न ठेवला नाही. तसेच दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत असून त्यामध्ये जनतेचे हाल होत आहेत. देशाचे २० जवान शहीद होत असताना लोकांना अंधारात ठेवणे हे चुकीचे असून हे जाणून घेण्याचा अधिकार सर्वसामान्यांचा आहे. परंतू जबाबदार सरकार म्हणून मोदी सांगत नाहीत असे सांगून ते म्हणाले की,यापूर्वी कोणत्याही सरकारच्या काळात एवढे जवान शहीद झाले नव्हते. एवढे जवान या सरकारच्या काळात शहीद झाले आहेत असा थेट आरोप करीत ते म्हणाले की, हे सरकारचे फार मोठे अपयश आहे हे अपयश झाकण्याचा प्रयत्न भाजप व त्यांच्या मंडळीकडून होत असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
 
Top