उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 सुनेनंतर सासूचा अहवाल ही कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. गावातील आणखी एक महिला पॉझिटीव्ह आल्याने शिराढोणमधील नागरिकांत भितीचे वातावरण आहे.
दोन दिवसांपुर्वी शिराढोण गावातील एक महिला लातूर शहरात उपचारासाठी गेली होती. मात्र सदर महिला मुंबई येथून काही दिवसांपूर्वी परतली होती. त्यामुळे महिलेचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना तत्काळ क्वारंटाईन करण्यात आले होते. रुग्ण महिलेच्या ८० वर्षीय सासुचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
मुरुमजवळील कोथळी येथील एक २३ वर्षीय युवक देखील पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील नागरिकांचाही शोध घेण्याचे काम सुरु आहे. हा युवक पुणे शहरातून दहा मे रोजी कोथळी गावी आला होता. ताप आल्याने त्याला शुक्रवारी (ता. २२) मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
आरोग्य तपासणी करीत त्याचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्य विभागाच्या पथकाने सर्वे करीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरु केली. कोथळीत तो किती लोकांच्या संपर्कात आला आहे. याबाबत माहिती मिळवण्याचे काम सुरु आहे.
जिल्ह्यामध्ये सद्य:स्थितीत कोरोनाचे २६ रुग्ण आढळले आहेत. सध्या २१ जणांवर उपचार सुरु आहेत. तर पाच जण उपचारानंतर बरे होउन घरी परतले आहेत. दरम्यान, परराज्यासह परजिल्हयातून येणाऱ्यांचा ओघ सुरुच आहे. सद्य:स्थितीला पाच हजार १५८ इतक्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये तीन हजार ४५३ लोकांना होम क्वारंटाईन, तर एक हजार ७०५ लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर चारशे लोकांना क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये आता रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून संख्या २६ वर गेली आहे. कळंब तालुक्यातील शिराढोण येथील एक महिला लातूर येथे उपचारासाठी गेली होती. स्वॅब नमुना पॉझिटिव्ह आल्याने त्या महिलेवर लातूर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर महिलेसोबत प्रवास करणारे कळंबचे पाच, लोहारा पाच, परंडा पाच, उमरगा चार, वाशी तीन, भूम दोन, तर उस्मानाबाद व तुळजापुर प्रत्येकी एक अशा २६ लोकांवर त्या त्या ठिकाणी उपचार सुरु आहेत.
कळंब येथील एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास सोलापुरच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एक हजार ७१ लोकांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यातील ९३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप ७३ अहवाल प्राप्त झाले नसून, त्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

 
Top