नागरिकांनी आपल्या नाकावर व तोंडावर मास्क अथवा स्वच्छ रुमाल बांधणे बंधनकारक
 उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील आदेशापर्यंत सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपल्या नाकावर व तोंडावर मास्क अथवा स्वच्छ रुमाल बांधणे तसेच एकमेकांपासून वैदयकीय निकषांनुसार निश्चित केलेले पुरेसे सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच   महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले.
महाराष्ट्र शासनाने कोविड-19 उपायोजना नियम 2020 प्रसिध्द केले असून यातील नियम क्र.3 नुसार करोना विषाणूमुळे (COVID-19) उद्वलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.  करोना विषाणू (COVID-19) हा संसर्गजन्य आजार आहे व त्याचा प्रादुर्भाव बाधित रुग्णाच्या शिंकेतून,खोकल्यातून बाहेर पडणा-या थेंबांद्वारे होत आहे.करोना विषाणू (COVID-19) चा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनाचा एक भाग म्हणून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना, शिंकतांना, खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर मास्क अथवा स्वच्छ रुमाल बांधणे तसेच एकमेंकापासून वैदयकीय निकषांनुसार निश्चित केलेले पुरेसे सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे, असे आदेशात नमूद केले आहे.
 
Top