उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उस्मानाबाद पालिका प्रशासनाने चोख नियोजन बजावले आहे. आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शहरात बाहेर गावातून येणाऱ्या नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदार वर्तन करणारांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करण्याऱ्या नागरिकांकडून रोख 500 रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.
 नगर परिषदेच्या वतीने घरोघरी जाऊन बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित केली जात आहे. काही भागात माहितीचे संकलन करताना येणाऱ्या अडचणींवर मात करून वस्तुनिष्ठ माहिती जिल्हा प्रशासनाकडे सादर केली जात आहे. कोरोनाचे संकट अधिक तीव्र होत असताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरातील दैनंदिन स्वछता आणि पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही याची विशेष खबरदारी घेतली जात आहे. लॉकडाऊन कालावधीत शहरातील गोरगरीब कुटूंब ज्यांचे हातावर पोट आहे अशा 140फिरस्ती कुटुंबांना पालिकेच्या माध्यमातून प्रति व्यक्ती  एक महिना पुरेल एवढे जीवनाश्यक साहित्य देण्यात आले आहे. यात तांदूळ, मसुर, शेंगदाणे, मीठ, तेल, मिरची पावडर, गुळ, पार्ले बिस्कीट, अंगाचे व कपड्याचे साबण आदी साहित्याचा समावेश आहे.
शहरातील सर्व नागरिकांना लॉकडाऊन कालावधीत घराबाहेर न पडता दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू  घरपोच पुरवण्यासाठी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या संकल्पनेतून भाजी, किराणा, दुध, फळे, मटन व चिकन  विक्रेत्यांच्या याद्या फोन नंबरसह तयार क
रून समाजमाध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे अनेकांची सोय झाली आहे. घरपोच सुविधा देत असताना अडचण येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने नगर पालिकेच्या माध्यमातून विक्रेत्यांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. ओळखपत्राचा गैर वापर केल्यास किंवा गैर वापर करताना निदर्शनास आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अशी तंबी देखील देण्यात आली आहे. फोनद्वारे संपर्क साधुन जीवनावश्यक वस्तूंची मागणी घरबसल्या करण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे.
शहराच्या सुरक्षिततेसाठी दंडात्मक कारवाई- राजेनिंबाळकर
नगर पालिकेचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सलग 24 तास हे काम सुरू आहे. असे असतानाही काही बेजबाबदार नागरिक स्वतःसह शहराचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य देखील धोक्यात टाकत आहेत. त्यांच्यावर पालिकेचे कर्मचारी करडी नजर ठेवून आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणारांकडून रोख 500 रुपये दंड वसूल केला जात आहे. त्याबरोबरच विनाकारण रस्त्यावर भटकंती करणारांवर देखील दंडात्मक कारवाई केली जाईल असे उस्मानाबाद पालिकेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे.

 
Top