
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी आणि भूम तालुक्यातील पाथरूड येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्ह्यातील 76 हजार 437 पात्र शेतक-यांच्या याद्या 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी आणि भूम तालुक्यातील पाथरूड येथील थकबाकीदार शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली.
तामलवाडी येथील तामलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख, तहसिलदार सौदागर तांदळे, सहाय्यक निबंधक विद्याधर माने, तामलवाडी गावचे सरपंच ज्ञानेश्वर माळी, उपसरपंच दत्तात्रय वडणे,पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शिंदे, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मल्लिकार्जुन मसुते, उपाध्यक्ष नानासाहेब पाटील, संचालक शिवदास पाटील, सुलेमान शेख, बलभीम व्हटकर, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब पाटील, ज्येष्ठ तपासणीस, जिल्हा मध्यवर्ती बँक पारवे, तलाठी श्री.शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी श्री.इंगळे, तामलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड चे गटसचिव सुधाकर लोंढे उपस्थित होते. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आज जिल्ह्यात तामलवाडी आणि पाथरूड येथील आधार प्रमाणीकरण व व महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या पथदर्शी योजनेचे हाती घेतले असून या दोन गावातील थकबाकीदार शेतक-यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला.
तामलवाडी येथील 202 तर पाथरूड येथील 110 पात्र शेतक-यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. या याद्यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर लगेचच सुधारणा केली जाईल, असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिका-यांनी आधार प्रमाणीकरणाच्या कामाची पाहणी केली तसेच त्यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना पोचपावत्यांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.