उस्मानाबाद/प्रतिनिधी-
राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, शेकापचे नेते भाई उध्दवराव पाटील यांची तत्वनिष्ठा व पक्षनिष्ठा, शेतक-यांविषयी असलेली तळमळ हे गुण आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. उध्दवरावदादा आज असते तर मराठवाड्याची ओळख आणखी वेगळीच राहिली असती, असे गौरवोद्गार खा. संभाजीराजे छत्रपती यांनी काढले.
शेतकरी, कष्टकरी, दीनदलितांचा कैवारी अशी ओळख असलेल्या भाई उध्दवराव पाटील यांच्या जन्मशताब्दीसोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुरुवारी (दि. 30) त्यांच्या सहका-यांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. सांगोल्याचे माजी आमदार, ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. खा. संभाजीराजे, आ. जयंत पाटील, अविनाश देशमुख, एम. डी. देशमुख, शशीकला घोगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खा. संभाजीराजे म्हणाले, की शेतकरी केंद्रबिंदू मानून भाई उध्दवरादादांनी काम केले. त्यांची राहणी साधी होती. तत्व, पक्षनिष्ठा मात्र उच्च दर्जाची होती. आजच्या पिढीला नेमकी याचीच गरज आहे. त्यामुळे आजच्या नेतृत्व करणा-या पिढीने उध्दवरावदादांच्या गुणांचे उनकरण गरजेचे आहे. पाच टर्म आमदारकी, खासदारकी उपभोगणारे भाई अखेरपर्यंत साधेपणाने जगले. आज मात्र एक टर्म आमदारकी मिळाली उंची जीवन जगणारे राजकीय नेते आपण पहात आहोत. हे चित्र नक्कीच बदलण्याची गरज आहे.
आ. जयंत पाटील म्हणाले, की भाई उध्दवरावदादांनी मराठवाड्यात बहुजनांचे राजकारण केले. शेतकरी, गोरगरीब, दलित, शेतमजूर हे त्यांच्या संघर्षाचे अधिष्ठान होते. त्यांच्या तालमीतच आम्ही घडलो. त्यामुळेच आमचे विचार किंवा पक्ष काही झाले तरी बदलले जात नाहीत. आम्ही विचारांवर व पक्षांतही ठाम राहतो. आम्ही संख्येने कमी असू विचाराने मात्र कच्चे नाही. 1957 मध्ये भाई उध्दवरावदादांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती. त्या वेळी काही घडामोडी अचानक घडल्या. त्या घडल्या नसत्या तर भाई मुख्यमंत्री झाले असते. मराठवाड्याची व महाराष्ट्राची ओळखही त्यांनी शेतक-यांची भूमी अशीच घडवली असती. त्यांची जन्मभूमी असलेल्या मराठवाड्यात प्रतिगामी शक्ती वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. भाईंचा वारसा त्यांचे पुत्र धनंजय पाटील यांनी पुढे त्याच गतीने चालविण्याची गरज आहे.
या वेळी आदर्श प्राथमिक विद्यामंदिराच्या नव्या इमारतीचे लोकार्पण खा. संभाजीराजेंच्या हस्ते करण्यात आले. राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. आनंद वीर यांनी सूत्रसंचालन केले.
----
उपकेंद्राला भाईंचे नाव द्या
आ. जयंत पाटील यांनी उस्मानाबादेतील विद्यापीठ उपकेंद्राला भाई उध्दवराव पाटील यांचे नाव देण्याची मागणी विधींमडळात केल्याची आठवण सांगितली. ते म्हणाले, की तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपकेंद्राला नव्हे तर नवे विद्यापीठ स्थापन करुन त्याला भाईंचे नाव देऊ असे सांगितले होते. त्यांच्या मनात नेमके काय होते याचा अंदाज उत्तरातून येतो. असू दे. आता नव्या सरकारने तरी या उपकेंद्राला भाई उध्दवरावदादांचे नाव द्यावे ही आमची मागणी कायम आहे.
---
हक्काचे 21 टीएमसी पाणी मिळावे
खा. संभाजीराजे म्हणाले, की उस्मानाबादेतील शेतक-यांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी या जिल्ह्याच्या हक्काचे 21 टीएमसी पाणी कृष्णा खो-यातून लवकर मिळावे. यासाठी विशेष बैठक होऊन हा प्रश्न गतीने सुटावा यासाठी मीही पाठपुरावा करेन.
 
Top