उस्मानाबाद/ प्रतिनिधी- बेंबळी गावात सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्याला बाजूला सारत बेंबळीतील नेत्यांनी आता गावातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या राजकीय वातावरण गरम बनले आहे. नुकतेच सरपंचांना अविश्वास प्रस्तावामुळे पायउतार व्हावे लागले. यामुळे बेंबळीला सध्या वाली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. रुईभर तलावामध्ये बऱ्यापैकी पाणी आले आहे. मात्र, अद्यापही गावातील नळाला पाणी मिळत नव्हते. तसेच उस्मानाबादला बेंबळीच्या हक्काचे पाणी पळवले जात होते. हे पाणी बेंबळीला पूर्ववत मिळण्यासाठी उस्मानबादचे पाणी बंद करावे, यासाठी नेत्यांनी कंबर कसली असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच रस्त्याच्या कामांसाठी गावातील बस बंद झाल्या होत्या. त्या पुन्हा सुरू करणे तसेच लातूर व बार्शी मुक्कामी बस गावात उपलब्ध करण्यासाठीही डेपो मॅनेजरला धारेवर धरण्यात आले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही आधार कार्ड अपडेटेशन होत आहे. मात्र, बेंबळी गाव मोठे असूनही येथे आधार कार्ड काढणे, बदल करणे आदी कामे करता येत नाहीत. यामुळे येथे केंद्र सुरू करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपसरपंच सत्तार शेख, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य मोहन खापरे, मिलींद पाटील, प्रकाश शेळके, शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाणआझाद युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सलीम शेख, युवक काँग्रेसचे तुळजापूर विधानसभा उपाध्यक्ष सलमान शेख, राजाभाऊ रसाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते
