परंडा/प्रतिनिधी-
शहरालगत खानापूर मार्गावर असलेल्या अवैध कत्तलखान्यावर उस्मानाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी (दि.14) रात्री 12.30 वाजेच्या सुमारास छापा टाकून गोवंश जातीचे 6 हजार किलो मांस व 7 संकरित गायी, 2 आयशर टेम्पो असा एकूण 24 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली.
पोलिसांनी सांगितले की, शहरालगत असलेल्या खानापूर मार्गावर लतीफ कुरेशी यांच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या जनावरांची कत्तल होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर परंडा पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद व स्थानिक गुन्हा शाखेचे पोउपनि पांडुरंग माने, सपोनि मोरे, पोहेकॉ जगदाळे, काझी, पो.ना.शेळके, सय्यद, आरसेवाड, खुणे आदींनी कत्तलखान्यावर छापा टाकला. यावेळी आदील कुरेशी, सरफराज कुरेशी, सोफीयान कुरेशी, मंजुर कुरेशी, अमजद कुरेशी, मयुर वाघचौरे (रा.परंडा) व संजय वेदपाठक (रा.सांगवी, बारामती) आदींनी गोंवश जातीच्या जनावरांची कत्तल करुन 6 हजार किलो मांस व कातडी (किंमत 7 लाख 20 हजार रुपये) विक्रीसाठी घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याचे व त्यांच्याजवळ 7 जिवंत संकरित गायी (किंमत 99 हजार रुपये), आयशर टेम्पो (एम.एच.42 ए.क्यु 4739) (किंमत 8 लाख 50 हजार), दुसरा टेम्पो (एमएच.42 टी.1342) (किंमत 7 लाख 50 हजार रुपये) असल्याचे पोलीसांना मिळुन आले. यातील चौघे पोलीस दिसताच फरार झाले आहेत. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक पांडुरंग माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन 7 जणांवर परंडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक साहेबराव राठोड करीत आहेत. 
 
Top