लोहारा/प्रतिनिधी
 लोहारा शहरासह तालुक्यात दि.24 सप्टेंबर 2019 रोजी मुसळधार पाऊस झाला. दरम्यान लोहारा तालुक्यातील मोघा (बु) येथे नदीच्या पुरात एक जण वाहून गेल्याची घटना घडली.
लोहारा शहरासह तालुक्यात सायंकाळी सहाच्या सुमारास पावसास सुरवात झाली. त्यानंतर रात्रभर विजेच्या कडकडाटासह जोरात पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक घरात पाणी घुसून नुकसान झाले. व शहरात पाणी वाहत असल्याने रस्ता दिसत नव्हता, या पावसामुळे शहरातील गावठान तळे व परिसरातील तळे तुडुंब भरुन वाहत आहेत. शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दरम्यान लोहारा तालुक्यातील मोघा येथील सुभाष भोंडवे (वय 58) हा इसम ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेला. ही दि.24 सप्टेंबर 2019 रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. सुभाष भोंडवे हे रात्री लोहारा येथुन मोघ्याकडे लूना या वाहानावरून निघालेे होते. परंतु मुसळधार झालेल्या पावसामुळे येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने ते पाण्यात वाहून गेले. सकाळी ग्रामस्थांना सुभाष भोंडवे यांची मोटारसायकल व त्यांचे साहित्य ओढ्याच्या कडेला आढळून आले. त्यानंतर तहसीलदार विजय अवधाने, कर्मचारी महेश क्षीरसागर व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळास भेट देवुन पाहणी करुन शोधमोहिम सुरु केली आहे. अध्यापपर्यंत प्रेत मिळुन आले नाही. या घटनास्थळी उमरगा, लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांनी भेट दिली आहे.

 
Top