उस्मानाबाद,/प्रतिनिधी-भारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा सार्वत्रिक निवडणूकची जाहिर करण्यात आली असून शनिवार (दि.21) पासून राज्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी आदर्श आचार संहितेचे कोटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले. 
येथील प्रशासकीय इमारतीतील डी.पी.सी. सभागृहात विभाग प्रमुख व नोडल अधिकारी अचार संहिता यांच्या बैठकीत श्रीमती मुधोळ-मुंडे या बोलत होत्या. यावेळी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पालवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिाकरी विठ्ठल उदमले, चारुशिला देशमुख, रामेश्वर रोडगे आणि मनिषा राशिनकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या की, सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय योजनाचे तसेच राजकीय व्यक्तींचे छायाचित्र असलेले फ्लेक्स, बॅनर, पोस्टर तात्काळ काढून टाकावेत. तसेच सार्वजनीक मालमत्तेवर लावण्यात आलेल्या राजकीय जाहिराती ही तात्काळ काढण्यात याव्यात. तसेच भूमिपूजन, उद्घाटनाच्या कोनशिला झाकुन ठेवाव्यात. आदर्श आचार संहितेच्या कालावधीत शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रचार करु नये किंवा त्यांना मदत करु नये.  आदर्श आचार संहितेच्या कालावधीत कोणतीही निवीदा प्रक्रिया, निविदा उघडणे, कार्यारंभ आदेश देणे किंवा नवीन काम सुरु होणार नाही याची सर्व संबंधीत विभागानी दक्षता घ्यावी. परंतू टंचाई संबंधीत कामे परवानगी घेवून करता येईल. तसेच विधानसभा निवडणुकीत सर्व समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने काम करा. तसेच सदर कामे करतांना आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल याची काळजी घ्यावी, असे ही श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या.
यावेळी जिपेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी आदर्श अचार संहितेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
 
Top