 उस्मानाबाद/प्रतिनिधी- बांधकाम मजूर असल्याची नोंद करून साहित्यासाठी ५ हजार रुपये मिळवून दिल्याबाबत बक्षीस म्हणून १५०० रुपयांची लाच स्विकारताना खासगी व्यक्ती हनुमंत आवड चतुर्भूज झाला आहे. याप्रकरणी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात (दि.२४) गुन्हा दाखल झाला.
तक्रारदार मजुरी, शेती व्यवसाय करीत आहेत. हनुमंत आवड (रा. आंबेहोळ, ता. उस्मानाबाद) यांनी तक्रारदार यांच्या पत्नीचे महाराष्ट्र शासन कामगार विभाग अंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ उस्मानाबाद येथे बांधकाम मजूर असल्याची नोंदणी केली होती. त्यामुळे त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात साहित्य खरेदीसाठी ५ हजार रुपये जमा झाले होते. हे काम आरोपीने लोकसेवकांवर कामगार संघटनेचा प्रभाव पाडून केले. यामुळे बक्षीस म्हणून १५०० रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने मंगळवारी (दि.२४) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद येथे तक्रार केली होती. याबाबत उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.२४) सापळा रचला. तसेच रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. |