प्रतिनिधी/उस्मानाबाद-
खासदार ओमराजे निंबाळकर व जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री यांची १६ जुलै रोजी भेट घेऊन कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत बैठक घेण्याची विनंती केली होती, असे असताना राष्ट्रवादीचे आमदार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घ्यावी अशी मागणी, करणे म्हणजे वरती मागून घोडे या म्हणीचा प्रत्यय येत आहे, अशी घणाघाती टिका शिवसेनेचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी रविवार दि. २१ जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प मंद गतीने सरकत असून सरकार त्यास पुरेसा पैसा देत नाही, दरवर्षी १२०० कोटी रूपये देणारे मुख्यमंत्री यांनी आडीशे कोटी रूपयात बोळवून केल्याची टिका आमदार पाटील यांनी करून या प्रकरणात कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पा संदर्भात आढावा बैठक घेण्याची मागणी केली होती. नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी १६ जुलै रोजी मंत्रालयात मुख्यमंत्र्यासमोर हा विषय मांडल्यानंतर परत इतरांनी आपला नाकर्तेपणा व अपयश झाकण्यासाठी हे नौंटकी चालू केल्याची कडक टिका राजेनिंबाळकर यांनी करून आपले पिता व काकांकडे हे खाते असताना प्रकल्पासाठी भरघोस निधी का आणला नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.