प्रतिनिधी/ उमरगा -
ग्रामीण भागातील गरीब महिलांना गरोदरपणात पोषक आहार व वेळीच योग्य औषधे मिळावीत, यासाठी पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेची निर्मिती केली गेली. गरोदर महिलेची हेळसांड होऊ नये, मातेला बळ यावे तसेच सदृढ बालक जन्माला यावे म्हणून केंद्रा कडून तीन टप्प्यात अनुदान दिले जाते. सदृढ बालक, मातेला बळ देणाऱ्या योजनेची तालुक्यात प्रभावी अंमल बजावणी होत नसल्याने अनेक लाभार्थ्याचे अनुदान रखडल्याचे आता पर्यंतच्या आकडेवारी वरून दिसून येत आहे.
उमरगा तालुक्यात 5 प्राथमिक आरोग्य केंद्र, 29 आरोग्य उपकेंद्र असून या अंतर्गत येणार्या गावातील 2 लाख 784 ईतकी लोकसंख्या आहे. यातील पहिल्या खेपेच्या नोंदणी केलेल्या गरोदर महिलांना लाभ दिला जातो. ग्रामीण भागातील गरोदर महिलेच्या आर्थिक परिस्थितीमुळे योग्य पोषण न मिळाल्यास बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. प्रसंगी कुपोषित बाळ जन्माला येते. मातेलाही आजार होण्याची शक्यता बळावते. हे रोखण्यासाठी पंतप्रधान मातृत्व वंदन योजना 1 जानेवारी 2017 मध्ये राबवण्यास सुरूवात केली. दुष्काळी तालुक्यात या योजनेची लाभार्थी संख्या मोठी आहे. त्यापैकी योजना सुरू झाल्या पासून जून 2019 अखेर पर्यंत पहिला 2 हजार 298, दुसरा 2 हजार 158 तर 2 हजार 76 लाभार्याना तिसर्या हप्त्या सह 89 लाख 87 हजार रुपयांचा लाभ झाला आहे. तर दुसर्या व तिसर्या हप्त्या साठी अनेक लाभार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याने सदर अनुदान रखडल्याची माहिती अधिकार्याच्या  उत्तरामुळे तसेच कागदपत्रे व ऑनलाईन नोंदीची अडचणीमुळे शासनाच्या अत्यंत महत्वाच्या मातृत्व वंदन योजनेचे अनुदान रखडले आहे.

 
Top