कळंब (प्रतिनिधी)- शेतकरी हा समाजाचा कणा असून, त्याच्या कष्टांना आणि योगदानाला सन्मान मिळणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या श्रमांचा गौरव करण्यासोबतच शेती, उद्योग, क्रीडा, सामाजिक आणि पोलिस दलातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने कळंब येथे चक्रवर्ती महात्मा बळीराजा स्मृती महोत्सव व शेतकरी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
बलिप्रतिपदा व शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अखंड मराठा समाज कार्यालयात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी, शेतीपूरक व्यवसाय करणारे उद्योजक, क्रीडा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसह कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ होते. आयुष मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संदीप तांबारे, मेजर सूर्यकांत खापे, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते ॲड. संतोष शिंदे, प्रा. तुषार वाघमारे, संभाजी ब्रिगेडचे संघटक अतुल गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. संदीप तांबारे, ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ आणि ॲड. संतोष शिंदे यांनी चक्रवर्ती महात्मा बळीराजा यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या ऐतिहासिक कार्याचे महत्त्व विशद केले. शेतकऱ्यांचे सामाजिक व आर्थिक योगदान अधोरेखित करत शेतकरी सन्मानाची गरज आणि समाजाने बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्याचे महत्त्व त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव
या सोहळ्यात धनंजय पुरेकर (शेळका धानोरा, फळबाग), राजाभाऊ पौळ (बोर्डा, फुलशेती व पॉलीहाऊस), राजेंद्र वाघमारे (पानगाव), अशोक कुरुंद (वाकडी, शेतीपूरक बहुपर्यायी शेती), विकास चोंदे (कळंब), डॉ. अभिजित लोंढे, गोपाळ उबाळे (कृषी प्रदर्शन), विकास शिरसाट, बलभीम सावंत, मच्छिंद्र कदम (भाट शिरपुरा, ॲपल बोर), अण्णासाहेब शिंदे (व्यवसाय), राजाभाऊ शंकर (चौसाळा, शेती व दुग्धव्यवसाय), उमेश लोकरे (खेर्डा, नैसर्गिक शेती), निलेश माळी (क्रीडा), महादेव डोईफोडे (शेती), रोहित शिंदे (शेतकरी आंदोलन), धोंगडे सर (गौर, शेतकरी बचत गट चळवळ) आणि समाधान वाघमारे (आयटी क्षेत्र) यांचा सन्मान करण्यात आला.
धाडसी कामगिरीबद्दल पोलिसांचा विशेष सन्मान
पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस हवालदार गणेश वाघमोडे यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अपहरणकर्त्याला शिताफीने अटक केली होती. तसेच कळंब बसस्थानक परिसरात पाच तोळे सोन्याची चोरी करून पसार होणाऱ्या आरोपीला पकडून चोरीचे सोने परत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल पोलिस हवालदार दिगंबर अंजान यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा. जगदीश गवळी यांनी केले. ॲड. घनश्याम रितापुरे यांनी प्रास्ताविक केले, तर ॲड. अशोक चोंदे यांनी आभार मानले.
मराठा सेवा संघाचे सचिव अरविंद शिंदे, माजी तालुकाध्यक्ष संदीप शेंडगे, ॲड. शिवराज मराठे, ॲड. अशोक चोंदे, महादेव सुतार, जावेदभाई सौदागर, शुभम पवार, युवराज नकाते, बप्पा चोंदे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. या सामाजिक उपक्रमाचे तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी स्वागत केले. सोहळ्यास तालुक्यातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
