भूम,(प्रतिनिधी)- भूम तालुका होमगार्ड पथकातील होमगार्ड सनद क्रमांक १५२० धनाजी कांबळे यांचे नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तादरम्यान निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी भूम तालुक्यातील सर्व होमगार्ड बांधवांनी एकत्र येत २५ हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली.
यावेळी दिवंगत धनाजी कांबळे यांचे आई-वडील, भाऊ तसेच गावचे पोलीस पाटील आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. होमगार्ड बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात दिला.
याप्रसंगी भूम तालुक्याचे समादेशक अधिकारी रवी गाढवे, पलटण नायक अंकुश थोरात, सार्जंट औदुंबर जाधव, सागर माने, संभाजी चौधरी यांच्यासह भूम तालुक्यातील होमगार्ड बांधव उपस्थित होते.
कर्तव्य बजावत असताना निधन झालेल्या आपल्या सहकाऱ्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून होमगार्ड बांधवांनी माणुसकी आणि एकजुटीचा आदर्श निर्माण केला.
