कळंब (प्रतिनिधी)- प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि गोरगरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांनी भविष्यात अधिकारी बनावे, या उद्देशाने राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत शिक्षक सचिन लांडगे लिखित ‘मी ज्ञानी होणार’ (२०२६-२७) या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी कळंब येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
खोंदला (ता. कळंब, जि. धाराशिव) येथील सुपुत्र सचिन लांडगे हे सध्या जिल्हा परिषद, नाशिक येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्यात सामान्य ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने ते गेल्या अनेक वर्षांपासून ‘मी ज्ञानी होणार’ हा उपक्रम राबवत आहेत.
कळंब शहरातील राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब चौक येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्याला मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, मुख्याध्यापक भागवत चौधरी, मुख्याध्यापक बाबासाहेब सारूक, विष्णू पाळवदे, लक्ष्मण मोरे, प्रशांत सलगरे, रणजित सोनुले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे ‘मी ज्ञानी होणार’ हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी संस्थेचे प्रमुख सचिन लांडगे यांनी पुस्तक निर्मितीमागील भूमिका स्पष्ट केली. ‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो,’ या भावनेतून शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्याच्या उद्देशाने स्वतःसह सहकारी आणि राज्यातील शिक्षकांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आढाळा (ता. कळंब) येथे विद्यार्थ्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन व वितरण करण्यात आले. यावेळी शिवानंदा स्वामी, तुकाराम कराळे आणि बलभीम राऊत उपस्थित होते.
सामान्य ज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची जाणीव निर्माण करून त्यांना भविष्यात अधिकारी होण्यासाठी प्रेरित करण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.
