वाशी (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या लाल मातीतील कुस्तीचा पारंपरिक वारसा जपत वाशी येथे भाऊबीजेच्या निमित्ताने दि. 11 नोव्हेंबर रोजी जय हनुमान तालीम मंडळ व शहरवासीयांच्या वतीने भव्य कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानात अविनाश गावडे याने सलग दुसऱ्या वर्षी मानाची कुस्ती जिंकत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. शिवशक्ती साखर कारखान्याचे चेअरमन पंडितराव आबा चेडे यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या 25 हजार रुपयांच्या मानाच्या कुस्तीत अविनाश गावडे याने प्रशांत चंदनकर याच्यावर मात करत विजय मिळवला.

या कुस्ती मैदानाचे उद्घाटन दुपारी तीन वाजता जय हनुमान तालीम मंडळाचे सदस्य, उपनगराध्यक्ष सुरेश कवडे व माजी नगराध्यक्ष नितीन चेडे यांच्या हस्ते करण्यात आले. या मैदानात वाशी तालुक्यासह कुर्डूवाडी, पंढरपूर, बार्शी, माढा, पुणे, सोलापूर आदी ठिकाणांहून नामवंत मल्लांनी सहभाग नोंदवला होता. बाल मल्लांसह महिला कुस्तीपटूंनीही विविध गटांत चुरशीच्या लढती देत उपस्थितांची मने जिंकली.

मैदानातील विविध कुस्त्यांनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेली अंतिम मानाची कुस्ती अविनाश गावडे व प्रशांत चंदनकर यांच्यात झाली. दोन्ही मल्लांनी सुरुवातीपासूनच जोरदार डावपेच लावत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत अविनाश गावडे याने बाजी मारत 25 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी मैदान मारत त्याने कुस्ती क्षेत्रातील आपला दबदबा कायम ठेवला.

या भव्य कुस्ती मैदानाच्या यशस्वी आयोजनासाठी जय हनुमान तालीम मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव सांडसे, माजी नगराध्यक्ष नितीन चेडे, उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, सचिव नागनाथ नाईकवाडी, कोषाध्यक्ष सदाशिव जगताप, सदस्य बळीराम कवडे, दादासाहेब चेडे, छगनराव मोळवणे, विकास मोळवणे, सूर्यकांत मोळवणे, नितीन कवडे, तुळशीदास करडे, जीवन कुंभार, सतीश कवडे, महादेव कांबळे तसेच वस्ताद गोविंद चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

कुस्ती मैदानात पंच म्हणून सतीश कवडे, जीवन कुंभार व नवनाथ मोरे यांनी काम पाहिले. यावेळी मल्लसम्राट रावसाहेब मगर, मदन देशमुख, बाळासाहेब आवारे व शिवाजी धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तर शिवशंकर राऊत, युवराज केचे व मोहसीन आतार यांनी आपल्या उत्कृष्ट समालोचनातून मैदानात रंगत आणली.

भाऊबीजेच्या निमित्ताने आयोजित या कुस्ती मैदानाला कुस्तीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मल्लांच्या दमदार डावपेचांना आणि चुरशीच्या लढतींना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक कुस्ती संस्कृती जपणाऱ्या या मैदानामुळे वाशीच्या क्रीडा परंपरेला पुन्हा एकदा उजाळा मिळाला.


 
Top