परंडा (प्रतिनिधी)- तालुक्यात आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पिके पाण्याअभावी हातातून गेली आहेत. तर उपलब्ध पाण्यावर कसाबसा जोपासलेला ऊस आता पाण्याअभावी वाळू लागला असतानाच, वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ऊस जळण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.परंडा तालुक्यातील खासपुरी नं-2 येथे ऐन तोडणीच्या तोंडावर स्पार्किंगमुळे तब्बल 13 एकरांवरील ऊस जळून खाक झाला.या दुर्घटनेत उसासह ठिबक सिंचन संच व इतर शेती साहित्याचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी पुरते हतबल झाले आहेत.
तालुक्यात गेल्या दहा दिवसांत विविध गावांमध्ये 100 एकराहून अधिक ऊस जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. खासापुरी नं-2 येथील बाधित शेतकऱ्यांमध्ये बाळासाहेब ज्ञानदेव देशमुख (4 एकर), पोपट मोहन देशमुख (4 एकर), विठ्ठल दिगंबर देशमुख (3 एकर), सदानंद रावसाहेब देशमुख (1 एकर) आणि गजानन रावसाहेब देशमुख (1 एकर) या पाच शेतकऱ्यांच्या एकूण 13 एकर उसाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार तानाजीराव सावंत यांच्या सूचनेनुसार शिवसेना नेते तथा माजी उपसभापती मेघराज पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व संकटग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.
