तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरात दिवाळीच्या उत्सवी वातावरणाला आगीच्या घटनेने गालबोट लागले. पाडव्याच्या पूर्वसंध्येला धाराशिव रोडवरील सारंग नारायण भोसले यांच्या मंडप साहित्याच्या दुकानाला भीषण आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या आगीत सुमारे 70 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अधिकृत पंचनामा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमराज निंबाळकर, युवा नेते मल्हार पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच सारंग भोसले व त्यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांना धीर दिला. या कठीण प्रसंगी भोसले परिवाराला शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
