धाराशिव  (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांतून लाखो भाविक तुळजापूरकडे पायी येणार आहेत. या काळात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी,संभाव्य वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तुळजापूर शहराकडे येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहतुकीच्या मार्गांत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.त्यानुसार 23 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12.01 वाजेपासून 26 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत (24.00 वाजेपर्यंत) निर्धारित मार्गांवर सर्व प्रकारच्या हलक्या व जड वाहनांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.या कालावधीत तुळजापूर घाटही सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक मार्गांत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव या कालावधीत साजरा होत आहे. या महोत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश,कर्नाटक आणि तेलंगणा आदी राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक पायी चालत तुळजापूर येथे येतात.त्यामुळे तुळजापूर शहरासह परिसरातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी होते. विशेषतः कोजागिरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी 24 ऑक्टोबर, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी 25 ऑक्टोबर आणि त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी मंदिर पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.या तीन दिवसांत सोलापूर रोड,नळदुर्ग रोड,लातूर रोड आणि धाराशिव रोड या प्रमुख मार्गांनी सुमारे सात ते आठ लाख भाविक पायी चालत तुळजापूरकडे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पोलीस विभागाच्या अहवालानुसार वाहतूक बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी 23 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत वाहतुकीच्या मार्गांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

या 14 मार्गांवर हलक्या व जड वाहनांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार 23 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 1 वाजेपासून 26 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत धाराशिव ते हैदराबाद, धाराशिव ते हैदराबाद, धाराशिव ते सोलापूर, लातूर ते सोलापूर,  छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर, तुळजापूर ते सोलापूर, तुळजापूर ते बार्शी या मार्गावरील तामलवाडी, नळदुर्ग, उमरगा, ढेकरी, गौडगाव मार्गे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. 





तुळजापूर घाट चार दिवस वाहतुकीसाठी बंद

कोजागिरी पौर्णिमा आणि मंदिर पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने तुळजापूर घाटातील वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे.त्यानुसार 23 ऑक्टोबर रोजी रात्री 1 वाजेपासून 26 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत तुळजापूर घाट सर्व प्रकारच्या हलक्या व जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.


भाविकांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य

आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करून येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. विशेषतः रस्त्याच्या कडेला विश्रांती घेणारे भाविक,पायी चालणारे भाविक आणि प्रमुख मार्गांवरील वाहनांची वर्दळ यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होऊ नये,यासाठी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.


या कालावधीत तुळजापूर शहर आणि परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये,भाविकांना सुरक्षितपणे पायी प्रवास करता यावा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहेत. वाहनचालक,प्रवासी आणि नागरिकांनी निर्धारित कालावधीत वाहतूक निर्बंधांची दखल घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे,असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.


 
Top