धाराशिव (प्रतिनिधी)- खून करून फरार झालेल्या आरोपींनी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांतून प्रवास करत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढत अवघ्या 48 तासांत दोघांना ताब्यात घेतले. या धडाकेबाज कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव शुभम धर्मराज सोमवंशी (वय 28) असे असून, त्यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यात आला. तपासात आरोपींनी धाराशिव येथून सोलापूर रेल्वे स्थानक, यादगीर (कर्नाटक), हैदराबाद, निजामाबाद आणि तुप्रान (तेलंगणा) परिसरातून प्रवास केल्याचे समोर आले. विविध ठिकाणी हालचाली करून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात येत होता.

मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा माग सोडला नाही. अखेर रवींद्र नव्हे, तर रमेश पांडव मेहर (वय 32, रा. खरमुंडा, ता. भटली, जि. बरगड, ओडिशा) आणि मोहम्मद वारिस सफोल अन्सारी (वय 19, रा. मधुपूर, जि. देवघर, झारखंड) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चार राज्यांतील हालचाली, लांबचा प्रवास आणि पोलिसांना चकवा देण्याचे प्रयत्न अशा परिस्थितीत आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेणे, ही धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, दयानंद गाडेकर तसेच पोलीस अंमलदार नागनाथ गुरव आणि प्रकाश बोईनवाड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

 
Top