भूम (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवाच्या आठव्या माळी दिवशी  दि. 18 ऑक्टोबर रोजी  अष्टमी दिवशी नगरहून निघालेला मानाचा पलंग आज भूम शहरातील कसबा विभागातील देवीच्या मंदिरात भाविक भक्तांनी स्वागत केले. पलंग दाखल होताच पलंगाचे सेवेकरी महादेव चव्हाण, बापू कुंभार, महेश बागडे, सुधाकर झील आदी सेवेकरी डोक्यावर पलंग घेऊन कसबा विभागातून पेठ विभागातील गोंधळी यांच्या घरापासून ते तेली यांच्या खुटावर विसावा घेतात. त्यानंतर शहरातून पलंगाचे तुळजापूरच्या दिशेने प्रस्थान होते.

साडेतीन शक्तीपीठात तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे महत्त्वाचे स्थान आहे. नवरात्र उत्सव काळात पालखी मधून सीमोल्लंघन केले जाते. कुलस्वामिनीच्या मंदिरातील प्रथा परंपरा शेकडे वर्षांपासून आजही भक्तिभावाने अखंडपणे जोपासली जात आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी लागणारी पालखी व पलंग पुरवण्याचा मान अहिल्यानगर शहराला आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेला लागणारा पलंग आणि पालखी घेऊन येण्याचा मान नगर तालुक्यातील बुन्हाणनगर गावाला आहे. येथील रहिवासी भगत यांना पालखीचा तर नालेगावातील पलंगे यांना पलंगाचा मान मिळालेला आहे. घटस्थापनेच्या दिवशी पलंग नगरमधील तुळजाभवानी मंदिरात दाखल होतो. दोन दिवस मुक्काम केल्यानंतर तिसऱ्या माळेला पलंग नगरजवळील भिंगार येथील हनुमान मंदिराकडे प्रस्थान करतो. याचवेळी राहुरी येथे तयार झालेली देवीची पालखी भिंगारमध्ये दाखल होते. अतिशय नयनरम्य सोहळ्यात तेथे पलंग आणि पालखीच्या भेटीचा सोहळा संपत्र होतो .

तुळजापूरला पलंग घेऊन जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील खुटेफळ, चिंचोडी पाटील, सय्यदपीर आणि कुंडी या चार गावचे लोक मानकरी म्हणून सोबत असतात. अशा रितीने नगर, भिंगार, जामखेड, बीड जिल्ह्यातील आष्टी, भूम, चिलवडी, आपसिंगामार्गे दसऱ्याच्या आदल्यादिवशी तुळजापुरात पलंग दाखल होतो.

 
Top