धाराशिव (प्रतिनिधी)- सलग 42 दिवस पावसाने ओढ दिल्याने धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकरी,शेतमजूर आणि पशुपालकांना बसत आहे.आगामी काळात पाणीटंचाई आणि चाराटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता, केवळ कागदोपत्री आराखडे तयार करून चालणार नाही. तर गावनिहाय सूक्ष्म नियोजन करून त्याची प्रत्यक्ष क्षेत्रावर प्रभावी अंमलबजावणी करावी. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देणे,त्यांचे मनोधैर्य वाढविणे आणि नागरिकांना दिलासा देणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी एकसंघपणे आणि समन्वयाने काम करून दुष्काळी परिस्थितीवर मात करावी,असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन समिती सभागृहात आयोजित दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात आणि निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले की,जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणीटंचाई निवारण, चारा उपलब्धता,जलसंधारण आणि रोजगारनिर्मितीच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येत आहे.प्रत्येक गावाची स्थानिक परिस्थिती आणि उपलब्ध साधनसंपत्ती लक्षात घेऊन दुष्काळ निवारणासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.शेतकऱ्यांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांच्या क्षेत्रीय भेटींवर विशेष भर देण्यात आला आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली. बैठकीला सर्व प्रशासकीय यंत्रणांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी, उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी,नगर पालिकांचे मुख्याधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
