धाराशिव (प्रतिनिधी)-  कष्टाने पेरलेले सोयाबीनचे पीक ऐन शेंगा भरण्याच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे हातचे गेले.शेतात सोयाबीनची झाडे उभी आहेत, मात्र त्यांची वाढ खुंटली असून, शेंगांमध्ये दाणेही बारीक राहिले आहेत.उत्पादनाचा खर्चही निघेल की नाही,अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.दुसरीकडे जनावरांसाठी चारा शिल्लक नसल्याने पशुधन कसे जगवायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. दुष्काळाच्या या विदारक परिस्थितीत शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. राजेश देशमुख यांनी तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे भेट देऊन सोयाबीन पीक नुकसानीची पाहणी केली.

जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालक सचिव डॉ.देशमुख यांनी तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथील शेतकरी देवानंद शिंदे यांच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी शिंदे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. सोयाबीनची पेरणी कधी केली. मागील वर्षी या शेतातून किती उत्पादन मिळाले होते. सोयाबीन व्यतिरिक्त आणखी कोणती पिके घेतली होती,सोयाबीनची कापणी कशा पद्धतीने केली जाते आणि कापणीसाठी किती खर्च येतो,याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सागर खटकाळे, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, ग्रामसेवक खोपडे आणि कृषी सहाय्यक  होळकर उपस्थित होते.

पालक सचिव यांनी रब्बी हंगामाबाबत विचारणा केली असता रब्बी हंगामात पाऊस झाला तर दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्वारीचे पीक घेण्याचा विचार आहे. शेतात विहीर आहे. मात्र सध्या विहिरीत पाणी नाही. यावर्षी शासकीय योजनेच्या माध्यमातून शेततळे बांधले आहे.तसेच सोयाबीनचे बियाणे महाडीबीटीच्या ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या या व्यथा ऐकताना पालक सचिव डॉ.देशमुख यांनी पिकाच्या नुकसानीबरोबरच पुढील हंगामातील शेतीच्या नियोजनाचीही माहिती घेतली. जनावरांना जगवायचे कसे दूध उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सोयाबीनच्या नुकसानीबरोबरच दुष्काळामुळे निर्माण झालेल्या चाराटंचाईचे गंभीर वास्तवही यावेळी समोर आले. देवसिंग (तुळ) येथील दूध उत्पादक शेतकरी नेताजी जाधव यांनी पालक सचिवांसमोर आपल्या अडचणी मांडल्या.  दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नियोजन केले असल्याचे डॉ.देशमुख यांनी सांगितले. चाऱ्यालाही हमीभाव देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 
Top