भुम (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथे मुस्लिम एकता सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आवेज तय्यबअली शेख यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून तुळजापूर तालुका अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट अशी कामगिरी अवेज शेख यांनी केलेली आहे. त्यांच्या या प्रमाणिक कार्याची पोचपावती म्हणून त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक कार्यातील रुची, समाजाप्रती असलेली बांधिलकी, नेतृत्वगुण आणि सामाजिक एकतेसाठी करीत असलेल्या प्रयत्नांचा विचार करून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संघटनेच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब, वंचित, शोषित आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच सर्वधर्मीयांमध्ये सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकतेची भावना वृद्धिंगत करणे, ही प्रमुख उद्दिष्टे आहेत. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवेज तय्यबअली शेख यांनी जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक व्यापक आणि मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटनेचा विस्तार करणे, संघटनेची ध्येयधोरणे व विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि सामाजिक न्यायासाठी सक्रियपणे कार्य करणे, या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असणार आहेत. आवेज शेख यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन एक वर्षासाठी संघटनेची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याप्रसंगी डॉ.खाजालाल ढोबळे आरोग्य विषयक मुस्लिम एकता लीगल ॲडव्हायझर, नौशाद पठाण, हाजी शेख, सद्दाम काजी, मोहसीन मोजन, अफसर पटेल, अरबाज शेख, अखिलेश जमादार आदी उपस्थित होते.


 
Top