धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय सहन करावी लागू नये,यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पाण्याचे उपलब्ध स्रोत,टँकरद्वारे पाणीपुरवठा तसेच खासगी विहिरींच्या अधिग्रहणाच्या माध्यमातून नागरिकांची तहान भागविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या नऊ गावांना 12 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून,पाणीटंचाई निवारणासाठी एकूण 286 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या 17 ऑक्टोबर 2026 रोजीच्या पाणीपुरवठा अहवालातून ही माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील काही भागांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी टँकर आणि विहीर अधिग्रहणाच्या माध्यमातून पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येत आहे.


धाराशिव तालुक्यात सर्वाधिक सात टँकर

धाराशिव तालुक्यातील पाच गावांमध्ये सात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.यामध्ये कोडगाव (बावी) येथे एक, कजरखेडा येथे एक,बोरखेडा येथे एक,पळसप येथे तीन आणि नांदुर्गा येथे एक टँकर सुरू आहे. उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे दोन,बलसूर येथे एक आणि आनंदनगर येथे एक,असे चार टँकर सुरू आहेत.लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे एक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तुळजापूर,कळंब,भूम, वाशी आणि परांडा या पाच तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू नाही. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी 286 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 


 
Top