धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने नागरिकांसह शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजनांचे नियोजन करण्यात येणार आहे. विशेषतः पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, आवश्यक ठिकाणी पाण्याचे हौद उभारणे तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी चारा लागवडीचे नियोजन करण्यावर भर देण्यात देणार आहे. जिल्ह्यातील 729 गावात जिल्हा परिषद स्व खर्चाने पाणीस व चाऱ्याचे नियोजन करणार असल्याची माहिती धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवार दि. 27 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, ग्रामीण पाणी पुरवठास विभागचे कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड उपस्थित होते. पुढे बोलताना अर्चना पाटील यांनी दुष्काळाचा परिणाम केवळ शेती आणि पिण्याच्या पाण्यापुरता मर्यादित राहत नसून त्याचा मोठा फटका पशुधनालाही बसतो. जनावरांना पुरेसे पाणी आणि चारा उपलब्ध न झाल्यास शेतकरी व पशुपालकांसमोर गंभीर अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन संभाव्य पाणीटंचाईच्या काळात पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्याची भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे जिल्हयातील 729 गावांमध्ये 5 हजार लि. पाण्याची टाकी देण्यात येणार आहे. तर पशुधनाची गणना करुन टॅग बसविण्यात येऊन पशुधनाच्या संख्येनुसार गावामध्ये पाण्याचे हौद उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जिल्हयातील पाझर तलाव, साठवण तलाव, कोल्हापुरी बंधारे याची पाहणी करुन आवश्यक ती दुरुस्तीची कामे करण्यात येतील. महिलांना स्वयंरोजागारासाठी सी. आर.पी. मार्फत प्रोत्साहीत करणार असून, महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणाऱ्या सी.आर.पी. ना 1 हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. अशी माहिती अर्चना पाटील यांनी दिली.
