धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्याच्या संसाराला आधार देणारे, शेतीच्या कामात मदतीला धावून येणारे आणि दूध उत्पादनातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावणारे पशुधन ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची मोठी ताकद आहे.मात्र,जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याचे आव्हान निर्माण झाले जिल्हा प्रशासन त्यासाठी प्रत्यक्षात नियोजन करत आहे.जिल्ह्यात 21 व्या पशुगणनेनुसार एकूण 5 लाख 95 हजार 844 पशुधन असून, त्यांच्यासाठी दररोज सुमारे 2 हजार 306 मेट्रिक टन वैरणीची आवश्यकता आहे.सध्या जिल्ह्यात उपलब्ध असलेला व उपलब्ध होणारा चारा 1 लाख 85 हजार 400 मेट्रिक टन असून,हा चारा डिसेंबर 2026 पर्यंत पुरेल,असा अंदाज पशुसंवर्धन विभागाने विभागाने व्यक्त केला आहे.
शेती आणि पशुपालन हे ग्रामीण जीवनाचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.विशेषतः धाराशिवसारख्या कृषिप्रधान जिल्ह्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतीतील अनिश्चित उत्पन्नाच्या काळात दूध उत्पादनातून मिळणारी नियमित कमाई शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार देते. त्यामुळे पशुधनाचे संगोपन आणि त्यांच्यासाठी पुरेशा चाऱ्याची उपलब्धता हा केवळ पशुसंवर्धनाचा विषय नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याशी थेट संबंधित प्रश्न बनला आहे. जिल्ह्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेता,आगामी काळात चारा व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. 21 व्या पशुगणनेनुसार (2025) धाराशिव जिल्ह्यात मोठ्या पशुधनाची (गायवर्ग व म्हैसवर्ग) संख्या 3 लाख 22 हजार 803 आहे.लहान पशुधनाची (गायवर्ग व म्हैसवर्ग) संख्या 48 हजार 233 असून, शेळ्या व मेंढ्यांची संख्या 2 लाख 24 हजार 808 आहे.अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण पशुधनाची संख्या 5 लाख 95 हजार 844 इतकी आहे.
या आकडेवारीवरून जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुपालनाचे असलेले महत्त्व अधोरेखित होते.गाय,म्हैस,बैल,शेळ्या आणि मेंढ्या हे शेतकरी व पशुपालकांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहेत. विशेषतः अल्पभूधारक शेतकरी,शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांसाठी शेळीपालन, मेंढीपालन आणि दुग्धव्यवसाय हे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत ठरतात. दररोज 2 हजार 306 मेट्रिक टन वैरणीची आवश्यकता आहे.