भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील नागरिकांना आपल्या समस्या व तक्रारी नगरपरिषदेकडे सहजपणे मांडता याव्यात, तसेच त्यासाठी नगरपरिषद कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात तक्रारपेटी ठेवण्यात येणार आहे. शहरातील 15 प्रभागांसाठी 15 तक्रारपेट्या ठेवण्यात आल्या असून, या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्यांचे निवारण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येक प्रभागातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तक्रारपेटीच्या वरील बाजूस संबंधित कर्मचाऱ्याचे नाव व मोबाईल संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रारपेटीत लेखी तक्रार टाकण्याबरोबरच संबंधित कर्मचाऱ्याशी थेट संपर्क साधून आपल्या समस्या सांगता येणार आहेत. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा संकलन, रस्ते, नाल्या, पथदिवे, सार्वजनिक सुविधा आदी विविध नागरी समस्यांबाबत नागरिक या तक्रारपेटीच्या माध्यमातून तक्रारी नोंदवू शकतात. नागरिकांनी आपल्या तक्रारी स्पष्टपणे नमूद करून त्या संबंधित प्रभागातील तक्रारपेटीत टाकाव्यात, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.
तक्रारपेट्यांमध्ये जमा होणाऱ्या तक्रारी एक दिवसाआड संकलित करण्यात येणार आहेत. त्यानंतर तक्रारींचे स्वरूप तपासून संबंधित विभागाकडे त्या पाठविण्यात येतील. तक्रारीची तातडी व स्वरूप लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर तिचे निराकरण करण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत नगराध्यक्षा संयोगिता गाढवे म्हणाल्या की, “नागरिकांना छोट्या-मोठ्या तक्रारींसाठी नगरपरिषद कार्यालयात वारंवार येण्याची वेळ येऊ नये, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
