*‘उमरगा येथे 100 खाटांचे महिला रुग्णालय
*मुरूम आणि लोहारा येथे प्रत्येकी 50 खाटांची उपजिल्हा रुग्णालये
*उमरगा येथे ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करण्यासाठी पाठपुरावा
धाराशिव (प्रतिनिधी)- पैशांअभावी कोणताही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये,ही राज्य शासनाची भूमिका आहे. आरोग्य शिबिरात उपचारासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाची काळजी घेतली जाईल. त्याच्या आजाराचे दुःख कमी करून आवश्यक उपचार मिळवून देण्यासाठी शासनाची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी मदत करेल,अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
रविवारी दि. 6 सप्टेंबर रोजी उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हा आरोग्य विभाग आणि शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघस्तरीय ‘मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिर-2026'चे उद्घाटन राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले.त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे होते. विधानपरिषद सदस्य आमदार बसवराज पाटील, विधानसभा सदस्य आमदार प्रवीण स्वामी, मुरूम नगर परिषदेचे अध्यक्ष बापूराव पाटील, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे आरोग्य उपसंचालक डॉ.स्वानंद सोनार, उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेचे सहअध्यक्ष शरण पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि लातूर विभागाच्या आरोग्य उपसंचालक डॉ.रेखा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
बोर्डीकर पुढे म्हणाल्या,आधुनिक उपचार पद्धतींचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यात येत आहे.आरोग्य व्यवस्थेमध्ये आशा सेविकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांना स्मार्टफोन देण्याची मागणीही पूर्ण करण्यात येईल. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पाच लाख रुपयांपर्यंत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.मुख्यमंत्री सहायता निधीतूनही गरजू रुग्णांच्या उपचारासाठी मदत केली जात आहे.अवयव प्रत्यारोपणासाठी 24 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचे साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
खासदार डॉ.अजित गोपछडे आमदार बसवराज पाटील, आमदार प्रवीण स्वामी, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरण पाटील यांनी केले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी उपस्थितांचे आभार मानले.

