धाराशिव (प्रतिनिधी)- कत्तलीच्या उद्देशाने जर्सी गाय आणि वासरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. पोलिसांनी टेम्पो आणि पिकअप वाहनातून 8 गायी व 2 वासरांची सुटका करून 18 लाख 5 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, 27 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. पथक आळणी चौक परिसरात आले असता, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अशोक लेलँड टेम्पो आणि पिकअप वाहनातून जर्सी गायी कत्तल करण्याच्या उद्देशाने येडशीकडून धाराशिवकडे घेऊन जात आहेत. माहिती मिळताच पथकाने आळणी चौकात सापळा रचला. येडशीकडून येणारे अशोक लेलँड टेम्पो क्र एमएच 25 एजे 6586 व पिकअप क्र एमएच 25 पी 4259 संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना हात दाखवून थांबवले. 

पोलीस पथकाने वाहनाच्या पाठीमागे जावून पाहणी केली असता सदर अशोक लिलॅड टेम्पो व पिकअप वाहनामध्ये अंदाजे 3 लाख 5 हजार रूपये किंमतीचे 8 गायी, दोन वासरे बांधून त्यांना पुरेसी हालचाल करता येणार नाही अशा रितीने छळ करुन त्यांची वाहतुक करीत असताना मिळून आले. त्याचे ताब्यातुन अंदाजे 3 लाख 5 हजार रूपये किंमतीचे गायी 8, दोन वासरे वाहनासह असा एकुण 18 लाख 5 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी दशरथ शंकर जगदाळे, वय 52 वर्षे, रा. हिवरा ता. भुम जि. धाराशिव, बालाजी भिकाजी सोनवणे, वय 38 वर्षे,  रा. भोनगिरी  ता. भुम, जि. धाराशिव यांचे विरुध्द धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अश्विन जाधव, पोलीस हवालदार समाधान वाघमारे, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस नाईक अशोक ढगारे, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड, केदार शेरखाने, पोलीस मुख्यालय येथील क्युआरटी पथकाचे अंमलदार यांच्या पथकांनी केली आहे.

 
Top