धाराशिव (प्रतिनिधी)- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल, तुळजापूरच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. लेझीम पथक, टाळ-मृदंग, वारकरी वेशभूषेतील विद्यार्थी तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या आकर्षक साकारलेल्या रूपामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक रणजीत मुंढे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी पालखीचे पूजन करून झाली. त्यानंतर विविधरंगी फुलांनी सजविलेल्या पालखीची शहरातील प्रमुख मार्गांवरून दिंडी काढण्यात आली. इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी “पंढरी पंढरी गा पंढरी“, “माऊली माऊली“, “हार बनुनी गळ्यात पडावा“, “विठू माऊली तू माऊली“ आदी अभंग व भक्तिगीतांवर नृत्याविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विठ्ठल-रुक्मिणी व वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी दिंडीचे आकर्षण वाढविले. सुमारे तीन तास चाललेल्या या पालखी सोहळ्यात विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विठ्ठल नामाच्या गजराने तुळजापूर शहराचे वातावरण भक्तिरसात रंगून गेले.
मुख्याध्यापक रणजीत मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक पी. बी. क्षीरसागर, सांस्कृतिक विभाग प्रमुख किसन क्षीरसागर, ओमप्रकाश कुंभार, क्रीडा विभाग प्रमुख नानासाहेब अधटराव, एनसीसी विभाग प्रमुख अमरसिंह घोरपडे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख किसन क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले.
