भूम (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भूम तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे यांच्या पुढाकारातून पंचायत समिती सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी तालुक्यातील 30 शाळांमधील 92 गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 

यावेळी मार्गदर्शन करताना वैशालीताई मोटे म्हणाल्या की, सध्याचे युग हे स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते शिक्षण मर्यादित न ठेवता स्पोकन इंग्लिश, संगणक शिक्षण आणि आधुनिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. भविष्यातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ज्ञानासोबत कौशल्यविकासही तितकाच महत्त्वाचा आहे. तसेच जीवनात यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतर त्या यशामागे असलेल्या पालक, शिक्षक, मार्गदर्शक आणि समाजाचे योगदान कधीही विसरू नये. कृतज्ञतेची भावना जपणे हेच खऱ्या यशाचे लक्षण असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. 

या कार्यक्रमास वैशालीताई मोटे,जी. प. सदस्य शुभांगी देशमुख, प. स. सदस्य मनोज अंधारे, बाळासाहेब खरवडे,प्रियांका गटकळ, आदिनाथ पालके,संजय पाटील,तात्यासाहेब गोरे, महादेव खैरे,काकासाहेब चव्हाण,गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, गटशिक्षणाधिकारी अनिता जगदाळे, सहाय्यक गटविकास अधिकारी शिवानी दैना, रंजना कदम, सूर्यकांत साळुंखे, मधुभाऊ मोटे, भाऊसाहेब खरसडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले तर आभार सूर्यकांत साळुंखे यांनी मानले


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top