धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात 72 विकास प्रकल्पांची कामे चालू आहेत. या 72 विकास प्रकल्पातून विभागणी करून 45 मुख्य विकास प्रकल्प पाहण्यासाठी अधिकारी यांच्याकडे जबाबदारी दिली असून, या विकास प्रकल्पाला येणाऱ्या अडचणी, मदत, सहकार्य हे करणे अपेक्षित आहे. जेणे करून विकास प्रकल्प प्रगतीपथावर राहतील. अशी माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवार दि. 6 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडावकर हे उपस्थित होते. या विकास प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी आसना साफ्टवेअर निर्माण केला असून, याद्वारे सध्या स्थितीमध्ये विकास प्रकल्प कोणत्या ठप्प्यामध्ये आहे यांची माहिती मिळणार आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास प्रकल्प यावर पूर्ण लक्ष ठेवण्यासाठी व विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व विकास प्रकल्पातील टेंडर प्रक्रियावर स्थानिक नागरिकांच्या सुचना घेवून जागतिक स्तरावरील तज्ञ लोकांची मदत घेतली जात आहे. नवीन मेडिकल कॉलेज बांधकाम व जागा ताब्यात घेणे यांची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी कडावकर यांच्याकडे दिली आहे. आमदार पाटील यांनी धाराशिव विमानतळ नव्याने विकसित करणे, त्याचप्रमाणे साडेतीन किलोमीटर नव्याने धावपट्टी बनवणे, त्याप्रमाणे तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाचे काम चालू करण्याची प्रक्रिया चालू आहे. तारा प्रकल्पाचे कामही लवकरच चालू होईल असे सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी कडावकर यांनी जलसंपदा विभागाचे कार्यालय व आयटीआयमधील काही बांधकाम पाडण्यासाठी 37 लाख रूपयांची आवश्यकता असून, शासकीय आयटीआयमधील मोकळ्या जागेवर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल असे सांगितले. या सर्व विकास कामांची जिल्हाधिकारी व पालक सचिव 15 दिवसाला आढावा घेत आहेत असे आमदार पाटील यांनी सांगितले.
