परंडा (प्रतिनिधी)- आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा शिल्पकार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामागे त्याचे आई-वडील, त्यांचे कष्ट, त्याग आणि अथक परिश्रम दडलेले असतात. मुलांनी मोठे व्हावे, चांगले शिक्षण घ्यावे, समाजात सन्मानाने जगावे आणि आपल्या कर्तृत्वाने कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे, ही प्रत्येक आई-वडिलांची आयुष्यभराची इच्छा असते. या स्वप्नासाठी ते स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवतात. स्वतःचे सुख-दुःख विसरून ते आपल्या मुलांच्या भविष्यासाठी झटत राहतात.

आई-वडील पहाटेपासून रात्रीपर्यंत कष्ट करतात. शेतात राबतात, मजुरी करतात, नोकरी करतात, व्यवसाय करतात; पण मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता राहू देत नाहीत. स्वतः जुन्या कपड्यांत समाधान मानतात, पण मुलांसाठी नवीन कपडे घेतात. स्वतःच्या गरजा कमी करतात, पण मुलांना चांगले शिक्षण, पुस्तके, मोबाईल, फी, वसतिगृह आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतात. कारण त्यांना विश्वास असतो की, आजचे कष्ट उद्याच्या यशात बदलतील.

परंतु आज काही विद्यार्थी या त्यागाची जाणीव ठेवत नाहीत. अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे, चुकीच्या संगतीत जाणे, वेळ वाया घालवणे, व्यसनांच्या आहारी जाणे किंवा पालकांच्या विश्वासाला तडा देणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. विद्यार्थ्याचे अपयश हे केवळ त्याचे वैयक्तिक नुकसान नसते; ते आई-वडिलांच्या आयुष्यभराच्या कष्टांवर पाणी फिरवणारे असते. त्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने तुटतात आणि मनात खोल वेदना निर्माण होतात.

आई-वडील मुलांकडून मोठ्या अपेक्षा ठेवतात; त्या अपेक्षा संपत्तीच्या नसतात, तर संस्कारांच्या असतात. त्यांना मुलांनी मोठे अधिकारी व्हावे, डॉक्टर, प्राध्यापक, अभियंता, शास्त्रज्ञ किंवा यशस्वी उद्योजक व्हावे, अशी इच्छा असते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांनी चांगला माणूस व्हावे, ही त्यांची खरी अपेक्षा असते.

विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, वेळ एकदा निघून गेली की परत येत नाही. शिक्षणाचे वय हे संघर्षाचे व कष्टाचे असते. आज केलेला अभ्यास उद्याचे भविष्य घडवतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा सन्मान करत प्रामाणिकपणे अभ्यास करावा, शिस्त पाळावी, वेळेचे महत्त्व ओळखावे आणि जीवनात निश्चित ध्येय ठेवून वाटचाल करावी.

जीवनाचे आणखी एक कटू वास्तव म्हणजे आई-वडील आयुष्यभर मुलांसाठी झिजतात. काळाच्या ओघात ते वृद्ध होतात. शरीर साथ देत नाही, पण मुलांबद्दलचे प्रेम कधीच कमी होत नाही. अशा वेळी जर मुलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्या भावनांचा आदर केला नाही किंवा त्यांना एकटे सोडले, तर त्यांच्यापेक्षा दुःखी दुसरे कोणी नसते. ज्यांनी आपल्या हाताला धरून चालायला शिकवले, त्यांचाच हात वृद्धापकाळात धरून चालविणे हे प्रत्येक मुलाचे नैतिक कर्तव्य आहे.

आई-वडिलांचे ऋण कधीही फेडता येत नाही; परंतु त्यांच्या कष्टाचे चीज करता येते. आपल्या यशाने, चांगल्या चारित्र्याने, आदरयुक्त वागणुकीने आणि त्यांच्या वृद्धापकाळात प्रेमाने त्यांची सेवा करूनच आपण त्यांचे ऋण अंशतः फेडू शकतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे हास्य हेच मुलाच्या यशाचे सर्वात मोठे पारितोषिक असते.

विद्यार्थ्यांनो, तुमचे आई-वडील तुमच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात. त्यांच्या डोळ्यांत तुमच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने आहेत. त्या स्वप्नांचा भंग करू नका. अभ्यास करा, प्रामाणिक राहा, चांगले संस्कार जोपासा आणि यशस्वी होऊन त्यांच्या त्यागाचे चीज करा. लक्षात ठेवा, जगात अनेक नाती मिळतील; पण आई-वडिलांसारखे निःस्वार्थ प्रेम करणारे दुसरे कोणीही मिळणार नाही.“आई-वडिलांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू हेच विद्यार्थ्याच्या यशाचे सर्वोच्च प्रमाणपत्र असते.“

 
Top