वाशी (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना आपले अर्थसहाय्य (अनुदान) पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तात्काळ करण्याचे आवाहन तहसीलदार, वाशी यांनी केले आहे.
विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय यांच्या सूचनेनुसार संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांचे डिजिटल हयात प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू असताना काही लाभार्थ्यांच्या नोंदीमध्ये “Beneficiary Record Not Registered with Scheme” अशी तांत्रिक अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यानुसार संबंधित लाभार्थ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र (ऑनलाईन UDID कार्ड), ई-आधार कार्डची छायांकित प्रत तसेच मोबाईल क्रमांक आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक अथवा तहसील कार्यालय, वाशी येथील संगांयो/इंगांयो विभागात तात्काळ सादर करावेत. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अद्याप ऑनलाईन UDID कार्ड उपलब्ध नाही, अशा लाभार्थ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून UDID कार्ड काढून घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे अनुदान/लाभ वितरित होण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कागदपत्रे वेळेत सादर न केल्यामुळे अनुदान वितरणात अडथळा निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्याची राहील, याची नोंद घ्यावी, असे जाहिर आवाहन तहसीलदार, वाशी यांनी केले आहे.