तुळजापुर (प्रतिनिधी)- विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या उद्योग विभागातर्फे आयोजित 'व्यावसायिक स्वयंरोजगार संवाद बैठक' इटकळ (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मराठी उद्योजकांचे सशक्त नेटवर्क उभारणे, स्वयंरोजगाराला चालना देणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे आणि स्थानिक उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या बैठकीला उद्योजक, व्यावसायिक, स्वयंरोजगार इच्छुक युवक तसेच मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.क

ार्यक्रमाच्या प्रारंभी विश्वमंगल मराठी फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी प्रास्ताविकातून संस्थेची ध्येय-धोरणे आणि उद्योग विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या 'विश्वमंगल मराठी बिझनेस फोरम' या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. मराठी उद्योजकांना एकत्र आणून व्यवसायवृद्धीसाठी सक्षम व्यासपीठ निर्माण करणे, परस्पर सहकार्य वाढविणे आणि 'लोकल टू ग्लोबल  ग्लोबल टू लोकल' ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यशस्वी उद्योजक मल्लिनाथ जळकोटे यांनी दुग्धव्यवसायातील आपल्या यशस्वी प्रवासाचे अनुभव कथन करत, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग-व्यवसायाकडे वळून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावे, असे आवाहन केले.सुदन सुरवसे यांनी शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, व्याज परतावा योजना तसेच विविध आर्थिक सहाय्य योजनांची माहिती देत नवउद्योजकांनी आणि महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग उभारावेत, असे सांगितले.प्रा. संगमेश्वर जळकोटे यांनी उद्योगाचे अर्थकारण स्पष्ट करत, एका उद्योगाभोवती अनेक पूरक व्यवसाय निर्माण होतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होते, असे सांगितले. आर्थिकदृष्ट्या सक्षम समाज घडविण्यासाठी तरुणांनी उद्योग क्षेत्रात पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकमंगल मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन बालाजी शिंदे यांनी 'लोकमंगल ते विश्वमंगल' हा प्रवास उलगडून सांगत, स्थानिक उद्योजकांनी एकत्र येऊन इटकळ परिसरात विश्वमंगल मराठी बिझनेस फोरमची शाखा स्थापन करावी आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून उद्योगवृद्धी साधावी, असे आवाहन केले.प्रमुख मार्गदर्शन करताना विश्वमंगल मराठी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष बापू देशमुख म्हणाले, “प्रत्येक संकटाकडे संधी म्हणून पाहण्याची वृत्ती उद्योजकाने जोपासली पाहिजे. सातत्य, अभ्यास, नावीन्य आणि समाजाच्या गरजा लक्षात घेऊन उद्योग उभारला तर यश निश्चित मिळते.“ते पुढे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या सुविधा यामुळे उद्योगांसाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया उद्योग, स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, 'एक गाव  एक उत्पादन' ही संकल्पना प्रभावीपणे राबविणे आणि स्थानिक उद्योजकांना जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी विश्वमंगल मराठी फाउंडेशन सातत्याने कार्य करणार आहे. अव्यवसाय प्रशिक्षण, मार्केटिंग, आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि उद्योगवृद्धीसाठी आवश्यक सर्व प्रकारचे सहकार्य फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मराठी भाषा, मराठी शाळांचा दर्जा उंचावणे, पसायदानाचा प्रसार, कृषी प्रदर्शन, प्रक्रिया उद्योगांना चालना आणि कृषी विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.परिसरातील उद्योजकांनी एक समिती स्थापन करून दर महिन्याला नियमित बैठका घेऊन परस्पर सहकार्याच्या माध्यमातून उद्योगवृद्धीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही आ. देशमुख यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. प्रास्ताविक विजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सुदन सुरवसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रतन सुरवसे यांनी केले.यावेळी मल्लिनाथ जळकोटे, प्रा. संगमेश्वर जळकोटे, लोकमंगल मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन बालाजी शिंदे, संचालक सचिन अडगळे, केशेगावचे सरपंच मल्लिनाथ गावडे यांच्यासह परिसरातील उद्योजक, व्यावसायिक, स्वयंरोजगार इच्छुक युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top