धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी (ता. धाराशिव) येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये शाळेतील एकूण सात विद्यार्थी पात्र ठरले. त्यामध्ये राजनंदिनी रंगनाथ देशमुख (300 पैकी 198 गुण), राजकन्या दत्ता वीर (180 गुण), स्वराज आण्णासाहेब राऊत (178 गुण), वैष्णवी हरिदास भांडेकर (174 गुण), आरोही पांडुरंग कदम (160 गुण), आदित्य धनंजय वीर (160 गुण) आणि काजल सचिन गायकवाड (142 गुण) यांनी यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
तसेच उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये आदित्यराज बाबासाहेब पौळ याने 300 पैकी 158 गुण मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरत शाळेचा गौरव वाढविला. यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा व मार्गदर्शक शिक्षिका राधाबाई वीर, स्वाती मुपडे तसेच उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीचे मार्गदर्शक दिनेश पेठे, जया बाई नवले आणि दीक्षित राजेंद्र यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी गावचे प्रथम नागरिक प्रमोद वीर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संजीवनी पौळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर लावंड, ग्रामपंचायत सदस्य अक्षय कदम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य निलेश देशमुख तसेच पालक प्रतिनिधी महानंदा साळुंके, दत्ता वीर,आण्णासाहेब राऊत, हरिदास भांडेकर, पांडुरंग कदम, लक्ष्मी गायकवाड आणि सुरेखा वीर, उषा यादव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी प्रास्ताविक मध्ये शाळेच्या गुणवत्तेची माहिती सांगून, गुणवत्ता वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर आणखी मोठे यश संपादन करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात सरपंच प्रमोद वीर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आध्यपण करणाऱ्या शिक्षकांचे आभार मानले तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षकांच्या परिश्रमांचे कौतुक करत शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या उल्लेखनीय यशामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा अधिक दृढ झाली असून, विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.सूत्रसंचालन श्री हनुमंत माने यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती राधाबाई वीर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती सुमन इंगळे, जायबाई नवले, सखुबाई कदम, स्वाती मुपडे, महादेवी सावळकर, नेहा भंडारे,, दिनेश पेठे, राजेंद्र दीक्षित, हनुमंत माने,अश्विनी भांगे यांनी परिश्रम घेतले.
