तुळजापूर (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांत शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत. खरीप हंगामातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी वेळेत ओळख करून सामूहिक पद्धतीने नियंत्रण उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर यांनी केले आहे.

कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. श्रीकृष्ण इंगळे, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) तसेच डॉ. सचिन सूर्यवंशी, कार्यक्रम समन्वयक व प्रमुख यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाळी वातावरणात शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची शक्यता असून, विशेषतः भात, ऊस, भाजीपाला आणि रोपवाटिकांमध्ये मोठे नुकसान होऊ शकते. शंखी गोगलगाय ही मृदुकाय वर्गातील कीड असून तिच्या शरीरावर कवच असते. ही कीड प्रामुख्याने रात्री सक्रिय असते. रोपवाटिकेतील कोवळी पाने, अंकुर आणि पिकांची पाने खाऊन ती नुकसान करते. पावसाळ्यात सप्टेंबरपर्यंत तिचा प्रादुर्भाव अधिक जाणवतो. एकट्या शेतकऱ्याने केलेल्या उपाययोजनांपेक्षा गावपातळीवर सामूहिक नियंत्रण मोहीम राबविल्यास अधिक प्रभावी परिणाम मिळू शकतो. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे गोगलगायींची सुषुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते. बोर्डो मिश्रण एक टक्का म्हणजे एक किलो मोरचूद, एक किलो चुना आणि 100 लिटर पाणी या प्रमाणात तयार करून फवारणी करावी. कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यासही नियंत्रणास मदत होते.


जैविक उपाययोजना

संध्याकाळी किंवा सूर्योदयापूर्वी गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात. गोळा करताना उघड्या हाताने न करता हातमोजे वापरणे आवश्यक आहे. बांधावर निंबोळी पावडर आठ किलो प्रति एकर, निंबोळी पेंड 20 किलो प्रति एकर किंवा आठ टक्के निंबोळी अर्काची फवारणी केल्यास गोगलगायी शेतात येण्यापासून परावृत्त होतात. लहान शंखी गोगलगायींच्या नियंत्रणासाठी 10 टक्के मिठाची फवारणी उपयुक्त ठरते. मात्र, पिकांचे नुकसान टाळण्यासाठी फवारणी करताना कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उपाययोजना केल्यास शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवता येईल आणि खरीप पिकांचे नुकसान टाळता येईल, असा विश्वास कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर यांनी व्यक्त केला आहे.


 
Top