धाराशिव (प्रतिनिधी)-  कवितेमध्ये आशय व भाषा सौंदर्य महत्त्वाचे असते.कविताही प्रतिभा प्रतिमा समता आशा व कल्पना यावर आधारित असावी लागते. जेथे प्रश्न निर्माण होतात तेथेच खरे शिक्षण मिळते. प्रयत्न, जिद्द, चिकाटी, तळमळ असल्याशिवाय यश मिळत नाही. विद्यार्थ्यांनी पाहिलेली स्वप्न सत्यात उतरावी लागतात. मराठी भाषा टिकून राहिली पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रा. रामदास केदार यांनी केले.

 ते लोकनेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त व शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त 30 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ जिल्हा धाराशिवच्या वतीने धाराशिव शहरातील विविध शाळांमध्ये बालभारती पाठ्यपुस्तकातील प्रत्यक्ष कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला उपक्रम राबविण्यात आला. गीत मराठी गाऊया या कविताचे उदगीर येथील कवी प्रा.रामदास केदार व शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी धाराशिव शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी व शिक्षकांसोबत दिलखुलास चर्चा केली.

 या कार्यक्रमास जिल्हा परिषद धाराशिवचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधा साळुंके, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. रवींद्र खंदारे, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे, प्रा.अंकुश नाडे, बालाजी तांबे,बालाजी इतबारे, राजकुमार मेंढेकर, राजेंद्र मडके, प्रा.राहुल पाटील, ललिता लोमटे  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आ.विक्रम काळे म्हणाले की मराठी आपली मातृभाषा असूनही या वर्षीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे मराठी विषयात नापास होण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मराठी भाषेची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी प्रत्यक्ष कवीचा सहवास लाभावा व साहित्याची गोडी लागावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. 

या उपक्रमामध्ये संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी सहभाग घेतला होता. शेवटी सर्व सहभागी शाळांचे व उपस्थितांचे आभार बालाजी तांबे यांनी मानले.


 
Top