धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
समितीचे अध्यक्ष तथा समन्वयक यांना पाठविलेल्या निवेदनात डॉ. पाटील यांनी शिक्षकांवर वाढत चाललेला अशैक्षणिक कामांचा बोजा, बीएलओ सारख्या अतिरिक्त जबाबदाऱ्या, संचमान्यता संदर्भातील प्रश्न, पदोन्नतीतील अडचणी तसेच सन 2023 पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी बाबत दिलासा देण्याची मागणी या सर्व बाबी न्याय्य असल्याचे नमूद केले आहे. या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “शिक्षकांना फक्त शिकवू द्या विद्यार्थ्यांना शिकू द्या“ ही भूमिका शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत, शिक्षकांना अध्यापनासाठी पूर्ण वेळ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण नैतिक पाठिंबा असल्याचे सांगत, शासनाने शिक्षकांच्या सर्व न्याय्य मागण्यांची तात्काळ दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी केली आहे. तसेच आंदोलनास मनःपूर्वक शुभेच्छा देत पूर्ण सहकार्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
