धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील वीरशैव समाजाच्या जंगम मठाच्या मालकीच्या जागेबाबत जाणीवपूर्वक अन्याय करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत जंगम मठ ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मठाच्या मालकीच्या जागेवर सभागृह उभारण्याची मागणी बेकायदेशीर असून अशा कोणत्याही प्रयत्नाला प्रतिबंध करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, तुळजापूर नगरपरिषदेच्या पाठीमागील सिटी सर्व्हे क्रमांक 972 ही जागा हैदराबाद इंडोमेंट रेग्युलेशन ॲक्ट 1349 फसलीनुसार नोंदणीकृत धार्मिक संस्थेची मालमत्ता आहे. 1962 मध्ये शासनाने तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली जंगम मठ ट्रस्टची स्थापना केली. या जागेतील 731 चौरस मीटर क्षेत्रावर नगरपरिषदेने 57 वर्षांपूर्वी भाजी मंडईचे आरक्षण टाकले होते. मात्र तत्कालीन तहसीलदारांनी या निर्णयास विरोध दर्शविला होता.
यानंतर नगरविकास विभागाने 1976, 1978 आणि 1983 मध्ये नगरपरिषदेच्या पुढील कारवाईला स्थगिती दिली. पुढे नगरपरिषदेकडून विविध ठरावांद्वारे संबंधित आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सुधारित विकास आराखड्यात ही जागा ट्रस्टच्या मालकीची कायम ठेवण्यात आली, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. ट्रस्टने 1984, 1989, 2010, 2016 तसेच 2024 आणि 2025 मध्ये नगरपरिषदेकडून बांधकाम परवानग्या घेऊन विविध बांधकामे केली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मठ परिसरातील सार्वजनिक शौचालयासाठी 1989 मध्ये ट्रस्टने सामाजिक हित लक्षात घेऊन जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र सध्या ती जागा वापरात नसल्याने ट्रस्टने मंजूर बांधकाम आराखड्यात तिचा समावेश केला असून त्यासाठी नगरपरिषदेची रीतसर परवानगीही घेतल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
