तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील जवाहर गल्लीतील नागरिकांच्या वतीने व माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 6 जुलै 2026 रोजी तुळजापूर नगरपरिषद कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
सदर प्रकरण हे तुळजापूर येथील सिटी सर्वे क्र. 972 मधील एकूण 2364.30 चौ.मी. जागेपैकी 731 चौ.मी. जागा भाजी मंडई व इतर सार्वजनिक उपयोगासाठी आरक्षित असल्याबाबत आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार दिनांक 30/11/1978 रोजी संबंधित जागेचे कायदेशीररित्या भूसंपादन करण्यात आले होते व त्याचा मोबदला संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आला होता.
त्यानंतर संबंधित जागेवर महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले असून उर्वरित जागा भाजी मंडईसाठी सार्वजनिक वापरात होती. मात्र अत्यंत गंभीर बाब म्हणजे नगर रचनाकार धाराशिव यांच्या वारंवार पत्रव्यवहारानंतरही काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वस्तुस्थिती जाणीवपूर्वक लपवून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, जागेचे भूसंपादन होऊन पंचाच्या हस्ते नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आलेले असताना, संबंधित जागेवर मूळ मालकास बांधकाम परवानगी देण्यात आली व त्या ठिकाणी व्यापारी संकुल व लॉजिंग उभारण्यात आले. संबंधित जागेचा कायदेशीर मालक नगरपरिषद असल्याचे कागदपत्र उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नगरपरिषदेमधील संबंधित अधिकारी व नगर अभियंता यांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करता किंवा माहिती असूनही बांधकाम परवानगी दिल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित बांधकाम परवाना रद्द करण्यात यावा तसेच सिटी सर्वे क्र. 972 पैक 7/5, 731 चौ.मी. जागा नगरपरिषदेच्या ताब्यात घेऊन नागरिकांच्या सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आजही संबंधित अधिकारी भूसंपादन संदर्भातील कागदपत्र उपलब्ध नसल्याचे किंवा सापडत नसल्याचे उत्तर देत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या संदर्भात निवेदन जयकुमार नागनाथ पांढरे, अमरीश जाधव, शहाजी भांजी व विकास शिंदे यांनी दिली.
