खडकी येथील पर्यायी रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला; प्रशासन आणि कंत्राटदारांचा निष्काळजीपणा उघड!
कळंब : लातूर–कळंब मार्गावरील खडकी येथे पुलाचे बांधकाम सुरू असताना वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता पहिल्याच मोठ्या पावसात वाहून गेल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर संताप व्यक्त होत आहे. लाखो रुपयांचा खर्च करून तयार केलेला हा रस्ता अवघ्या काही तासांच्या पावसात वाहून जाणे म्हणजे कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसानंतर पर्यायी रस्त्याचे मोठे नुकसान झाले असून लातूर–कळंब मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. हजारो प्रवाशांना आणि वाहनचालकांना याचा फटका बसत असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, पर्यायी रस्ता तयार करताना आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन करण्यात आले नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. पुलाच्या कामासाठी मुख्य रस्ता बंद करून पर्यायी मार्ग उभारला गेला, मात्र त्याची मजबुती आणि पावसाळी परिस्थितीचा कोणताही विचार करण्यात आला नसल्याचा आरोप होत आहे.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार हेमंत ढोकले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अभियंते व कंत्राटदारांना तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले. मात्र नागरिकांचा सवाल असा आहे की, रस्ता वाहून गेल्यानंतर आदेश देण्यापेक्षा तो वाहून जाऊ नये यासाठी आधीच योग्य नियोजन का करण्यात आले नाही?
दरम्यान, प्रशासनाकडून वाहनचालकांना एकुरका–जवळा मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र एका चुकीच्या नियोजनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून दोषींवर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
"पहिल्याच पावसात वाहून जाणारा रस्ता म्हणजे विकासकामांचा दर्जा किती सुमार आहे, याचे ज्वलंत उदाहरण आहे. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी," अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.