अहिल्याच्या लेकींनी मोठ्या उत्साहात साजरी केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती




​पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर:।

पुण्यश्लोको विदेहश्च पुण्यश्लोको जनार्दन:।।

​अर्थात, राजा नल, धर्मराज युधिष्ठिर, विदेहाचा राजा जनक आणि भगवान विष्णू (जनार्दन) हे पुण्यश्लोक असून त्यांच्या उच्चाराने आपली वाणी जेवढी पवित्र होते, तेवढीच ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आदरपूर्वक गौरवल्याने होते. माळव्याच्या भूमीतील कर्तृत्ववान क्षत्राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती 'अहिल्या सखी मंच'च्या वतीने आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

​अहिल्यादेवींचे आजोळ असलेल्या चोराखळी गावातील पापनाश मंदिरात अभिषेक व पूजा करून या जयंती सप्ताहाची सुरुवात 'अहिल्याच्या लेकींनी' मोठ्या दिमाखात केली. आज जयंतीदिनी नवजात मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. तसेच मातांचा सन्मान करून त्यांना कपडे व भेटवस्तू देण्यात आल्या. "मुलीने यशवंत, कीर्तिवंत, गुणवंत व्हावे आणि माता अहिल्येसारखे तेजस्वी, प्रकाशमान व्हावे," असे चिंतन करत मुलीचे नाव 'अहिल्या' ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

​भुकेल्याची भूक आणि तहानलेल्याची तहान ओळखून गरजूंसाठी स्वतःच्या खजिन्यातून दानधर्म करणाऱ्या अहिल्यादेवी केवळ देवभोळ्या नव्हत्या, तर त्यांच्यापाशी अनुभवाचे अथांग ज्ञान होते. कीर्तन, प्रवचन, पुराण आणि अध्यात्माच्या जोरावर अहिल्यादेवींनी उभारलेली मंदिरे आणि घाट ही कायमस्वरूपी संस्काराची केंद्रे आहेत. याच संस्कारांचा एक भाग म्हणून 'अन्नपूर्णा मोफत अन्नछत्राला' अन्नदान करून गरजू रुग्णांच्या नातेवाईकांची एक दिवसाची भूक भागवण्याचा स्तुत्य प्रयत्न आज अहिल्याच्या लेकींनी केला.

​"स्नानाने देहशुद्धी, ध्यानाने मनशुद्धी व दानाने धनशुद्धी होते," या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्या सखी मंचाकडून विविध उपक्रम राबवण्यात आले. 'संस्कृती ही भोगावर नाही तर त्यागावर उभी असून, सर्व मानवजातीमध्ये देवाचा अंश आहे,' असे मानणाऱ्या अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा मंचाने जपला आहे. आज अहिल्या सखी मंचाच्या वतीने अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी आणि अहिल्यादेवींच्या विचारांचा व प्रतिभेचा वारसा जपणाऱ्या समाजबांधवांसमवेत ही जयंती साजरी करण्यात आली.

​या कार्यक्रमास अहिल्या सखी मंचच्या कार्यकारिणी अध्यक्षा डॉ. शैलजा कुलकर्णी, उपाध्यक्षा ॲड. जयश्री तेरकर, सचिव उषा लांडगे, कोषाध्यक्षा प्रमिला बावकर, सहसचिव शितल करडे, सहकोषाध्यक्षा मानसी डोलारे यांच्यासह मंचातील सर्व सख्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

 
Top