तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरातील शुक्रवार पेठसह शहरातील विविध भागांमध्ये मंगळवारी गढूळ पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नळातून अस्वच्छ व मळकट पाणी येत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून नगरपरिषद प्रशासनाने तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, जलजन्य आजार आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असताना शहरात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, नुकत्याच शहरातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही नागरिकांना गढूळ पाणी मिळत असल्याने टाक्यांच्या स्वच्छतेबरोबरच जलशुद्धीकरण प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहराला स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रक्रियेत दर्जेदार तुरटी, आवश्यक रसायने, पावडर व लिक्विड क्लिनिंग घटकांचा प्रभावी वापर करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच पाणीपुरवठ्याची नियमित तपासणी करून गुणवत्तेचे परीक्षण करावे आणि गढूळ पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 
Top